व्यापार्‍यांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक   

पुणे : राज्यभरातील विविध व्यापार्‍यांच्या प्रश्नासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत व्यापार्‍यांच्या प्रश्नाबाबत शासन सकारात्मक असल्याचे स्पष्ट करण्यात आले, अशी माहिती महाराष्ट्र राज्य व्यापारी कृती समितीचे समन्वयक राजेंद्र बाठिया यांनी दिली.
 
या बैठकीला कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, अल्पसंख्यांक विकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ, पणनमंत्री जयकुमार रावल यांच्यासह मुख्य सचिव व अधिकारी उपस्थित होते. या बैठकीमध्ये पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा झाली. राष्ट्रीय बाजार समितीबाबत पणनमंत्री व पणन खात्याचे मुख्य सचिव यांच्याबरोबर चर्चा करून निर्णय घेण्यात येईल, असे अजित पवार यांनी स्पष्ट केले. 
 
कृषी उत्पन्न बाजार समितीतील व्यापार वाढीसाठी व्यापारी प्रतिनिधी व सर्व घटकांना समवेत घेऊन येत्या ३ महिन्यामध्ये सकारत्मक निर्णय घेण्यात येईल. तसेच बाजार समितीच्या कर रचनेमध्ये योग्य तो बदल करण्याचा विचार करण्यात येईल. तसेच व्यवसाय कराबाबत कृती समितीने मांडलेल्या प्रश्नाबाबत बैठकीमध्ये सकारात्मक निर्णय घेण्याबाबत सूचित करण्यात आले. जीएसटीच्या विविध प्रश्नांबाबत महाराष्ट्राच्या जीएसटीच्या मुख्य आयुक्तांबरोबर चर्चा करुन प्रश्न सोडविण्याचे आश्वासन या बैठकीत व्यापार्‍यांना देण्यात आले. या बैठकीला फॅमचे अध्यक्ष जितेंद्र शहा, महाराष्ट्र राज्य कृती समितीचे समन्वयक राजेंद्र बाठिया, दि पूना मर्चेंटस् चेंबरचे अध्यक्ष रायकुमार नहार, सचिव ईश्वर नहार आदी उपस्थित होते, असेही राजेंद्र बाठिया यांनी सांगितले. 

Related Articles